Wednesday, 19 August 2020

त्याग म्हणजे काय?... २

भोग द्यावे देवा । त्याग भोगीच बरवा ।।
 
आपण व्हावे एकीकडे । देव कळेवरी जोडे ।।
 
योजे यथाकाळे । उत्तम पाला कंद मुळे ।।
 
वंचकासी दोष । तुका म्हणे मिथ्या सोस ।।
 
**********************************
 
तुकाराम महाराज म्हणतात की येथे ह्या संसारात आल्यावर भोग भोगताना (मग ते कितीही चांगले असोत किंवा वाईट) ते नेहमी देवाला समर्पित करावे, त्याला अर्पण करावेत, म्हणजेच व्यावहारिकदृष्ट्या ते जरी आपणच भोगत असलो तरीही ते भोगताना आपण 'हे देवाला अर्पण करत आहोत' ह्या भावनेने भोगावेत आणि आपण बाजूला व्हावे व्हावे आणि अशारितीने ते भोगले असता 'भोग भोगणे' हे मग त्यागासमानच होऊन जाते.

म्हणजेच आपल्या दिशेला आलेले सर्व भोग आपण बाजूला होऊन नित्य आपण देवाला समर्पित करत राहिलो तर मग देव देखील ते भोगण्यासाठी आनंदाने आपल्या अंतरात येतो आणि स्वतः जातीने ते भोगू लागतो आणि त्याचा परिणाम असा होतो की शेवटी देव आपल्या देहातच येऊन वास करू लागतो. आणि एकदा का असा नेम झाला आणि देवाने आपल्या देहात येऊन वस्ती केली किंवा तळ ठोकला की त्या भोगापासून होणाऱ्या सुखदुःखामुळे मग आपल्या चित्ताला लेशमात्र हर्ष आणि खेद होत नाही. (कोणत्याही भोगाने मग मनावर देखील आघात होत नाहीत) आणि अशारितीने एकदा का देवाने आपले शरीर बळकावले की मग तोच त्याची योग्य ती सर्व काळजी वाहतो, त्याला आवश्यक असलेले सर्व उपाय मग तो जातीने योजतो, देहाला लागणारे उत्तम अन्न, म्हणजेच उत्तम पाला आणि कंदमुळे मग तोच त्याला त्या त्या काळी स्वतःच जातीने पुरवितो किंबहुना तोच त्याची सर्व ती जबाबदारी घेतो आणि त्यापुढे मग आपल्याला आपल्या शरीराची देखील काळजी आणि चिंता वाहावी लागत नाही.

तुकोबाराय शेवटी म्हणतात की परंतु असे न करता जो मनुष्य आयुष्य स्वतःसाठी भोगतो, एकही भोग देवाला अर्पण न करता ते सर्व स्वतःच भोगतो, म्हणजेच कृष्णार्पण करण्यापासून स्वतःला वंचित ठेवतो त्याला त्याचा दोष लागून त्याला जातीने सर्व कर्मांचे परिणाम भोगावे लागतात, म्हणजेच असा हा मनुष्य कर्मबंधामध्ये अडकून त्याद्वारे येणाऱ्या सर्व सुख-दुःखांना त्यालाच सामोरे जावे लागते आणि सर्व मिथ्या सोस देखील सहन करावा लागतो.

अभंग १२४९

**********************************
🚩🚩म्हणून ते लोकांना सांगतात की तुम्ही उगाच त्यागाच्या भानगडीत पडूच नका, जे काही वाट्याला येईल ते निमूटपणे भोगा किंवा देवाच्या चरणी वहा, मग तोच तुमचे सर्व भोग आनंदाने भोगेल... 
**********************************
 
नको सांडूं अन्न नको सेवूं वन । चिंतीं नारायण सर्व भोगीं ।।
 
मातेचिये खांदीं बाळ नेणे सीण । भावना त्या भिन्न मुंडाविया ।।
 
नको गुंपों भोगीं नको पडों त्यागीं । लावुनि सरें अंगीं देवाचिया ।।
 
तुका म्हणे नको पुसों वेळोवेळां । उपदेश वेगळा उरला नाहीं ।।
 
**********************************
तुकाराम महाराज त्यागाच्या मागे धावणाऱ्या लोकांना उद्देशून म्हणतात की तुम्ही व्यर्थ कोणताही आणि कसलाही त्याग करण्याच्या भानगडीत पडू नका, त्यासाठी अन्नपाणी सोडू नका किंवा घरादाराचा त्याग करून वनात जाऊ नका, उलट सर्व भोग ग्रहण करण्याऱ्या त्या एका नारायणाचे चिंतन करत जा.

ते म्हणतात ज्याप्रमाणे लहान मुल सतत आईच्या खांद्यावर राहून सर्व भोग भोगत असते, तिच्या अंगाला अंग लावून अनेक सुखदुःखाला सामोरे जाते परंतु तरीही ते किंचितदेखील दुःखीकष्टी होत नाही आणि तसे झालेले दिसतही नाही, कारण त्याच्या मनात आपण आईपासून वेगळे आहोत, भिन्न आहोत अशी भावनाच नसते, किंबहुना भेदाची भावना उपटून काढण्यासाठी तशी भावनाच तेथे उपजत नाही. त्यामुळे त्याच्या वाट्याला येणारे सर्व भोग आईच भोगते आहे असा त्याचा समज होऊन त्या भोगांपासून उपजणारी कोणतीही भीती, कसलेही क्लेश मग त्याच्या मनाला शिवत नाहीत.

म्हणून ते इतरांना सांगतात तुम्हीदेखील अगदी तसेच वागा. तुम्हीदेखील वाया कोणत्याही प्रकारच्या भोगात गुंतून पडू नका किंवा त्या भोगांचा त्याग करण्याच्या भानगडीत देखील पडू नका, (कारण तसे कितीही केले तरीही शक्य नाही.) म्हणजेच देवाच्या अंगाला अंग लावून सर्व भोग त्यालाच अर्पण करा आणि असे करत राहिल्याने तुम्हांला मग त्याचा क्षीण वाटणार नाही, त्रास होणार नाही, किंबहुना तसे ते वाटणेच बंद होऊन आपण स्वतः भोग भोगत आहोत अशी भावनाच अंती उरत नाही.

तुकोबाराय शेवटी म्हणतात की त्यामुळे जे कोणी येथे व्यर्थ त्यागाच्या भानगडीत पडू पाहत आहेत त्यांना माझा हाच उपदेश असेल आणि हेच सांगणे असेल आणि याव्यतिरिक्त त्यांच्यासाठी माझ्यापाशी आता वेगळा असा उपदेश उरलेला नसून तेच तेच सारखे विचारून वेळ वाया दवडू नका. 
अभंग ८१६

**********************************
🚩🚩ते म्हणतात मीदेखील देवाचे नाम घेऊनच, म्हणजेच श्री हरिचे गीत आणि नाम गाता गाता सर्व भोग भोगले आणि तसे ते भोगल्याने ते सर्व भोग मग आमच्यासाठी त्यागासमानच झाले आणि त्यामुळे अंती सर्व भोगांतून माझी सुटका झाली... 
**********************************
 
भोगी जाला त्याग । गीतीं गाता पांडुरंग । इंद्रियांचा लाग । आम्हांवरुनि चुकला ।।
 
करुनि ठेविलों निश्चळ । भय नाही तळमळ । घेतला सकळ । अवघा भार विठ्ठलें ।।
 
तळी पक्षिणीचे परी । नखें चोची चारा धरी । आणुनियां घरी । मुखी घाली बाळका ।।
 
तुका म्हणे ये आवडी । आम्ही पायी दिली बुडी । आहे तेथे जोडी । जन्मांतरीचे ठेवणे ।।
 
**********************************
तुकाराम महाराज म्हणतात की आम्हीदेखील भोग भोगताना पांडुरंगाचे नाम घेतले, त्याची गीते गायली, त्यामुळे आमचे सर्व भोग मग स्वतःच भोगून त्याने आमची त्या भोगांतून संपूर्ण सुटकाच केली आणि त्या भोगातच आमच्याकडून त्याग घडून आला, म्हणजेच अशारीतीने भोग भोगल्याने ते आम्हांला त्यागाचे फळ देऊन गेले. 
एवढेच नव्हे तर इंद्रियांच्या भोगातून देखील आमची सहज सुटका झाली, म्हणजेच इंद्रियभोग भोगताना देखील ते सर्व भोग नाम घेऊन आम्ही श्री हरिला अर्पण केल्याने त्यात अधिक अडकत न जाता उलट त्यापासून आमची हळूहळू परंतु सहज सुटका झाली आणि नकळतपणे आमच्यापाठी लागलेला इंद्रियांचा लाग (विषयांचा घाला) देखील आपोआपच चुकविला गेला. किंबहुना तो असा काही चुकविला गेला की तो आता आम्हांला न ओळखताच आमच्यावरून निघून जातो. ते म्हणतात अशाप्रकारे वाचेने सतत नारायण गायल्याने आमची इंद्रियांच्या जाचातून देखील अलगदपणे सुटका झाली.
ते पुढे म्हणतात की त्यामुळे आता अशी परिस्थिती आली आहे की देवाने आम्हांला निश्चल करून ठेवले आहे आणि आमचा सर्व भार स्वतःच्या शिरी घेऊन आम्हांला कसलीच चिंता, भय, तळमळ उरू दिली नाही, आणि ज्याप्रमाणे पक्षिणी आकाशात राहून जमिनीवर असलेल्या तिच्या पिलांवर संपूर्ण लक्ष ठेवते आणि स्वतःच्या नखात व चोचीत चारा धरून आणून ती जशी आपल्या पिल्लांच्या मुखी घालते, त्याप्रमाणेच माझी  विठाई देखील आता आमच्या सर्व योगक्षेमाची जबाबदारी स्वतःच जातीने घेते आणि आम्हांला कशाचीही कमी पडू देत नाही.

तुकोबाराय शेवटी म्हणतात की आम्हीदेखील आता तिच्या आवडीने आणि तिच्या प्रेमासाठी तिच्या पायी संपूर्ण बुडी दिली आहे, तीला कायावाचामानाने शरण गेलो आहोत आणि सतत तिच्या चरणांपाशीच वास करून असतो, कारण तेथेच आता आम्हांला आमच्या जन्म-जन्मांतरीचा ठेवा सापडला आहे, तेथेच आमचे सर्व सुख आहे.

अभंग ३१०४

No comments:

Post a Comment