Wednesday, 19 August 2020

त्याग म्हणजे काय?... १

भोगे घडे त्याग । त्यागें अंगा येती भोग ।।

ऐसे उफराटे वर्म । धर्मा अंगीच अधर्म ।।

देव अंतरे ते पाप । खोटे उगवा संकल्प ।।

तुका म्हणे भीड खोटी । लाभ विचाराचे पोटी ।।

**********************************
तुकाराम महाराज म्हणतात जो विचारपूर्वक आणि विहिताला धरून विषय भोगतो त्याला त्यागाचे सुख लाभते, परंतु जो लाभापोटी विषयाचा त्याग करतो अशा त्यागातून त्याच्या वाट्याला केवळ भोगच येतात.

तुकाराम महाराज म्हणतात वरवर पाहता हे विधान कितीही अन्यथा(चुकीचे) व उफराटे वाटत असले तरी हेच सत्य आहे, कारण लाभासाठी व स्वार्थासाठी केलेला त्याग हा खरा नसून केवळ देखाव्यापुरता असतो आणि विहित कर्तव्य करण्यासाठी केलेले कोणतेही कर्म हे नेहमी त्यागासमान असते. कारण ते म्हणतात अधर्म हा कितीही धर्मासारखा वाटत असला तरीही किंवा तो तसा कितीही भासवण्याचा प्रयत्न केला तरीही त्यामागील खरा हेतू लक्षात घेऊनच त्याकडे पाहावे आणि तसे पडताळल्यावरच कळून येते की धर्माच्या नावाखाली अधर्मच अधिक होत आहे किंवा असतो.

ते पुढे सांगतात की ज्या कोणत्या कर्माने देव अंतरतो ते पाप आहे आणि त्यासाठी केलेला संकल्पदेखील खोटा समजावा, त्यामुळे कोणी असे संकल्प करूच नये .

तुकोबाराय शेवटी म्हणतात अशा लोकांनी 'आपण किती देवाला घाबरतो व त्यासाठी कर्मकांडांत जराही कमतरता येऊ देत नाही' असे कितीही दाखवायचे प्रयत्न केले तरी ते पूर्ण खोटे असते, कारण ते म्हणतात अशा लोकांच्या चित्ती देवाविषयीची भीड सर्वथा खोटी असून कर्मकांडापासून होणाऱ्या किंवा मिळणाऱ्या लाभाचे विचारच त्यांच्या मनी अधिक असतात.

अभंग ६८


**********************************
🚩🚩उलट ते म्हणतात विधीने म्हणजेच नीतिनियमाने केलेले विषयांचे सेवन देखील मग त्यागासमानच होते आणि त्याचे उचितच फळ मिळते...
**********************************

विधीने सेवन । विषय त्यागाते समान ।।

मुख्य धर्म देव चित्ती । आदि अवसान अंती ।।

बहु अतिशय खोटा । तर्के होती बहु वाटा ।।

तुका म्हणे भावे । कृपा करीजेते देवे ।।

**********************************
तुकाराम महाराज म्हणतात विधीनुसार किंवा शास्त्रानुसार विषयांचे सेवन केले असता विषय देखील मनुष्याला मग त्यागाचीच भावना देतात आणि त्यापासून त्यांना त्यागाचेच फळ मिळते, कारण ते विषयसुख न राहता ते त्यागासमान गणले जाते.

ते म्हणतात माणसाचा मुख्य धर्म हा देवाचे चिंतन करणे हा आहे. म्हणजेच जन्माला आल्यापासून मरेपर्यंत, म्हणजेच आदी, अंती आणि अवसानी(म्हणजे भान असताना) देवाचे चित्तात ध्यान करणे, त्याची सदैव आठवण ठेवणे हाच मनुष्याचा मुख्य धर्म असून त्याने त्याविषयी नित्य जागरूक असावे. परंतु तसे न करता तो ह्याविषयी जर मनी शंका-कुशंका घेत राहील, किंवा हरिचिंतन आणि हरिभजनाविषयी त्याची बुद्धी तर्क-वितर्क करीत राहील तर त्यापासून अनेक फाटे फुटून तो मग नको त्या मार्गांकडे भरकटत जाईल.

तुकोबाराय शेवटी म्हणतात म्हणूनच मनुष्याने मनी देवाविषयी सतत भक्तिभाव ठेवावा, त्याविषयी जाण असू द्यावी, त्याला मनोभावे भजावे आणि असे झाले की मग देवच त्याच्यावर कृपा करतो आणि त्याला योग्य तो मार्ग दाखवतो.

अभंग १७४

**********************************
🚩🚩ते म्हणतात मी देखील जेव्हा विधीने आणि नीतीने आयुष्याची कर्तव्ये पार पाडत गेलो, ती नेमाने आचरत गेलो आणि माझ्या हातून त्याग कसा सहज घडत गेला मला कळले देखील नाही...
**********************************
त्याग तंव मज न वजता केला । काहीच विठ्ठला मनातूनी ।।

भागलिया आला उबग सहज । न धरिता काज झाले मनी ।।

देह जड झाले ऋणाच्या आभारे । केले संवसारे कासावीस ।।

तुका म्हणे गेला आळस किळस । अकर्तव्य दोष निवारले ।।

**********************************
तुकाराम महाराज म्हणतात अहो पांडुरंगा, अहो नारायणा मी केवळ नीतीने वागल्याने आणि विधीने सर्व कर्तव्ये पार पाडल्याने माझ्या हातून आता सहज त्याग घडून येत आहे आणि तोदेखील मनातून कोणत्याही गोष्टीचा खऱ्या अर्थाने त्याग न करता, कसल्याही गोष्टीला प्रयत्नाने तिलांजली न देता. म्हणजेच त्यागासाठी जाणीवपूर्वक मी काहीही प्रयत्न न घेतादेखील माझ्या मनातून इच्छा-आकांक्षाचा सहज त्याग घडत आहे आणि तोदेखील मागे काहीही न शिल्लक ठेवता.

ते म्हणतात एवढेच नव्हे तर संसाराच्या गोष्टी भागवता भागवता मला त्याविषयी देखील मनी सहजच उबग येऊ लागला आणि कसलेही कारण नसताना मनात त्यागाची भावना सहज उत्पन्न झाली.

त्यामुळे आता ह्या संसारात राहून यापेक्षा अधिक भोग भोगणे हे मला ऋण काढल्यासारखे वाटू लागले आहे आणि त्याखाली मी दबला जात आहे, म्हणजेच आपल्या वाटणीचे घेऊन सरले आहे अशी जाणीव झाल्याने ह्या ऋणाचे मी कितीही आभार मानले तरीही ह्या ऋणाच्या भावनेने किंवा त्याच्या आभाराने माझा देह जड होऊ पाहत आहे, त्यामुळे पूर्ण संसारानेच माझे मन आता कासावीस होत आहे.

तुकोबाराय शेवटी म्हणतात की त्यामुळे आता परमार्थाकडे मी सहज वळलो असून त्याविषयी माझा आळस, मला वाटणारा किळस आता सहजरित्या दूर झाला आहे आणि अशारितीने मी माझ्या उच्च हिताकडे देखील वळलो आहे आणि एवढेच नव्हे तर त्यामुळे अकर्तव्यसारख्या म्हणजेच चुकीच्या आणि नियमांना सोडून असणाऱ्या गोष्टी किंवा कर्मे सहज डावलली जात असून त्यामुळे माझ्या सर्व दोषांचे आपोआप निवारण होत आहे .

अभंग ४२२

(म्हणजेच संसारात संयमाने वागले असता, विधीने कर्तव्ये आचरली असता आणि मनावर नियंत्रण ठेवून अकर्तव्यांच्या / निषिद्ध कर्मांचा त्याग केला असता मनुष्याच्या मनाला सहज विरक्ती शिवते, त्यासाठीचे वेगळे प्रयत्न घ्यावे लागत नाहीत.)

#TukaramGatha #Abhang #SantTukaram #VitthalBhakti #TukaMhane    

No comments:

Post a Comment