Recents in Beach

भोग तो न घडे संचितावाचूनि...

भोग भोगणे का येते?

🚩🚩मनुष्याच्या वाट्याला भोग येतात कारण त्याचे प्रारब्ध, त्याचे संचित/कर्म, परिस्थितीला शरण जाऊन त्यात्या वेळी त्याच्या हातून घडलेली विपरीत कर्मे तर कधी स्वार्थासाठी त्याने आचरलेली निषिद्ध किंवा पापकर्मे. आणि ह्यासर्वाचे फळ म्हणूनच त्याच्या नशिबी भोग भोगणे येते, वाट्याला दुःख येतात.

आणि तुकोबा तर म्हणतात ज्या तीव्रतेचे दुःख/भोग असतील त्याच प्रमाणात त्याच्या हातून वाईट कर्मे घडली आहेत म्हणून जाणावे.

परंतु चांगल्या भोगाविषयी मनुष्याला काही वाटत नाही, पण वाईट भोग भोगताना मात्र त्याचा उद्वेग होतो, त्याचा त्रागा होतो आणि तो देवाला दुषणे देत सुटतो, त्याला नावे ठेवतो, कित्येकवेळा तर त्याचा तोल सुटून आणि त्यात भर म्हणून तो पुन्हा नको ती कर्मे आचरून स्वतःच्या प्रारब्धात अजूनच भर घालतो.

परंतु तुकोबा म्हणतात अशावेळी कोणालाही दुषणे न देता प्रत्येकाने स्वतःच्या नशिबाला किंवा प्रारब्धाला दोष द्यावा आणि प्रारब्धच त्यामागील कारण आहे हे लक्षात घेऊन आलेले सर्व भोग शांत चित्ताने भोगावेत.

कारण अशा परिस्थितीत मन जर शांत असेल तरच त्याला त्यातून सुटण्याचा मार्ग सापडतो, नाहीतर परिस्थिती आणि त्याची अवस्था अजूनच बिकट होत जाते.

तुकोबा पुढील अभंगात म्हणतात... 

🌼🌼🌼🌼
भोग तो न घडे संचितावाचूनि । करावे ते मनी
समाधान ।।
म्हणउनि मनी मानू नये खेदु । म्हणावा गोविंदु
वेळोवेळा ।।
आणिका रुसावे न लगे बहुता । आपुल्या
संचितावाचुनिया ।।
तुका म्हणे भार घातलियावरी । होईल कैवारी
नारायण ।।

🌼🌼🌼🌼

तुकाराम महाराज म्हणतात मनुष्याच्या वाट्याला येणारे भोग हे प्रामुख्याने त्याच्या संचितामुळे, त्याच्या पूर्व कर्मांमुळे असतात. त्यामुळे ते भोगतेवेळी त्याने ते समाधान चित्ताने भोगावेत व आपल्याच पूर्वकर्माचे ते फळ असल्याने त्याविषयी मनात किंचितही खेद मानू नये.

उलट अशावेळी वाचेने त्या एका श्री हरि गोविंदाचे नाम घ्यावे, त्याच्या नामाचा जयघोष करावा आणि मुख्य म्हणजे आपण भोगत असलेले भोग आपल्याच प्रारब्धाचे फळ असल्याने त्या भोगांना कंटाळून किंवा त्याचा त्रागा करून इतर कोणावरही रुसू नये किंवा कोपू नये. किंबहुना रुसावे लागल्यास त्याने आपल्या दैवावरच रुसावे आणि द्यावा लागल्यास त्याने आपल्या एका नशिबालाच दोष द्यावा.

तुकोबाराय शेवटी म्हणतात परंतु आनंदाची बाब म्हणजे ह्याही परिस्थितीतून मार्ग काढता येतो. आणि प्रारब्धातून सुटणे कितीही कठीण असले तरीही अशा परिस्थितीतून देखील सहीसलामत सुटता येते आणि त्यासाठी मी तुम्हांला एक युक्ती सांगतो. आणि ती म्हणजे देवाला शरण जाणे.

म्हणजे देवाला श्रद्धेने शरण जाऊन त्याचे पाय दृढ धरले असता आणि त्यावर आपला संपूर्ण भार टाकून त्याला गयावया केली, त्याला साकडे घातले असता मग देवाला देखील त्यावर टाकलेला सर्व भार स्वतःच्या शिरी घ्यावाच लागतो आणि शरण आलेल्यांचे रक्षण करावेच लागते.

कारण तुकोबा म्हणतात की देव एवढा कृपाळू, मायाळू आहे की तो याचकाला केव्हाही रिकाम्या हाती माघारी धाडत नाही. किंबहुना शरण आलेल्यांना तो संपूर्ण संरक्षण देतो, उलट त्यांचा कैवारच घेऊन आणि त्यांना पाठीशी घालून त्यांची संकटांतून संपूर्ण मुक्तता करतो आणि त्यांचे संपूर्ण दुःख निवारतो.

अभंग १६३७

 

Post a Comment

0 Comments