Recents in Beach

जन्मा येणे घडे पातकाचे मूळ

किंबहुना मनुष्य जन्मालाच येतो ते भोग भोगण्यासाठी...त्याने आचरलेल्या पापकर्मांची आणि संचिताची(पुण्याची) फळे भोगण्यासाठी.

तुकाराम महाराज पुढे म्हणतात मनुष्य जन्मच मुळात घेतो ते भोग भोगण्यासाठी, त्याने आचरलेल्या पापकर्मांची आणि संचिताची(पुण्याची) फळे भोगण्यासाठी.

म्हणजे मनुष्य जन्मालाच येतो ते त्याच्या पाप/कर्मामुळे व त्याच्या संचितामुळे आणि त्यापासून मिळणारे सुखदुखरुपी फळे भोगण्यासाठी.

आणि म्हणुनच तुकोबा म्हणतात मनुष्यदेहात येऊन प्रत्येकानेच येथे प्रसंगानुसार येणाऱ्या प्रत्येक भोगाला सामोरे जाण्यास नेहमी तयार असावे आणि ते भोगताना केव्हाही त्यात गुंतून जाऊ नये आणि मनावर त्याचे चांगलेवाईट पडसाद देखील पडू देऊ नये.

म्हणजे चांगले भोग भोगताना गहिवरून जाऊ नये तर वाईट भोगांचे व्यर्थ दुःख वाहू नये, त्याचा त्रागा करत बसू नये आणि इतरांवर तर सोडाच परंतु त्याने देवावर देखील त्याचा राग काढू नये.

उलट अशा ह्या कठीण काळात तोच एकमेव सहाय्यकर्ता असतो हे लक्षात घेऊन त्याला जीवेभावे शरण जावे, त्याची कास धरावी आणि त्याला साकडे घालावे.

कारण मनुष्याला त्याच्या कठीण प्रारब्धातून जर कोणी बाहेर काढू शकतो, त्याची असह्य अशा भोगांतून जर कोणी सहीसलामत सुटका करू शकतो तर तो एकमेव श्री हरिच असून त्याला येथे प्रत्येकाने कायावाचामने शरण जावे, त्याला चुकूनही विन्मुख न होता त्याचे पाय दृढ धरावे, त्याचे नाम गावे, किंबहुना त्याचे पदोपदी स्मरण असू द्यावे.

ज्यामुळे मनुष्य मग केवळ दैनंदिनच नव्हे तर उभ्या जन्माचेच दुःख विसरतो, त्याला त्याच्या संपूर्ण आयुष्याच्याच दुःखाचे विस्मरण घडते आणि देवाची कास अशारितीने दृढ धरून ठेवल्याने शेवटी ह्या मायेतूनच किंबहुना ह्या संपूर्ण संसारातूनच त्याची सुटका होऊन त्यापायी येणाऱ्या सर्व भोगांपासून त्याची मुक्तता होते.

तुकोबा पुढील अभंगात म्हणतात...  

🌼🌼🌼🌼
जन्मा येणे घडे पातकाचे मूळ । संचिताचे फळ
आपुलिया ।।
मग वायावीण दुःख वाहू नये । रुसोनीयां काय
देवावरी ।।
ठाऊकाची आहे संसार दुःखाचा । चित्ती सीण याचा
वाहू नये ।।
तुका म्हणे त्याचे नाव आठवावे । तेणे विसरावे
जन्मदुःख ।।
🌼🌼🌼🌼

तुकाराम महाराज म्हणतात जन्म घ्यावा लागणे किंवा जन्माला येणे हेच मनुष्याने केलेल्या पापाचे किंवा पातकाचे मूळ असून जन्माला येण्याचे घडणे हे आपल्या संचिताचेच फळ असते हे येथे प्रत्येकाने लक्षात घ्यावे.

त्यामुळे ह्या संसारात येऊन पदरी येणाऱ्या दुःखकष्टांचे येथे कोणीही मनी व्यर्थ दुःख वाहू नये व चित्ती त्याचा खेद करत बसू नये आणि देवावर तर अजिबात रुसू नये. कारण ते म्हणतात देवावर रुसून काय होणार? त्याने कोणता लाभ पदरी येणार?

ते म्हणतात हा संसार मुळातच दुःखाचा असतो, कष्टप्रद असतो आणि हे सर्वांना येथे आपसूकच ठाऊक असते, त्यामुळे कोणीही चित्तात त्याविषयी व्यर्थ सीण वाहू नये.

तुकोबा शेवटी म्हणतात उलट अशावेळी देवाला विन्मुख होण्याऐवजी त्याला सर्वभावे शरण जावे, त्याची कास घट्ट धरावी, त्याचे पाय दृढ धरून ठेवावेत, त्याची आठवण ठेवावी, त्याचे नाम गावे जेणेकरून मनुष्य मग त्याच्या उभ्या जन्माचेच दुःख विसरतो.

म्हणजे केवळ रोजच्या जीवनातीलच नव्हे तर संपूर्ण जन्माच्याच दुःखातून त्याची सुटका होऊन त्याचे जन्ममरणाचेच दुःख शेवटी कायमचे संपुष्टात येते आणि जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून त्याची एकदाची सुटका होते.

अभंग २०९९

Post a Comment

0 Comments