Recents in Beach

मनुष्याने धैर्य का खचू देऊ नये? किंवा धीर का बाळगावा? आणि परिस्थितीला शरण का जाऊ नये? धीर तो कारण । साह्य होतो नारायण...

तुकोबा म्हणतात कारण धीर धरून ठेवल्यानेच आणि संकटाला हिमतीने तोंड देत राहिल्याने मग देवाला देखील अशा मनुष्याची दया देऊन तो त्याच्यावर आपली कृपादृष्टि फेरतो, त्याच्या मदतीला धावून जातो आणि त्यास सहाय्य करतो.

तुकोबा पुढील अभंगात म्हणतात...  🎵

🌻🌻🌻🌻
धीर तो कारण । साह्य होतो
नारायण ।
नेदी होऊ सीण । वाहो चिंता
दासांची ।।
सुखे करावे कीर्तन । हर्षे गावे
हरीचे गुण ।
वारी सुदर्शन । आपणचि
कळिकाळ ।।
जीव वेंची माता । बाळा जडभारी
होता ।
तो तो नव्हे दाता । प्राकृता
यांसारिखा ।।
हे तो माझ्या अनुभवे । अनुभवा आले
जीवे ।
तुका म्हणे सत्य व्हावे । आहाच नये
कारणा ।।

🌻🌻🌻🌻

तुकाराम महाराज म्हणतात कठीण प्रसंगांना सामोरे जाताना किंवा भोग भोगताना मनुष्याने नित्य धैर्य बाळगावे, धीर राखावा आणि मुख्य म्हणजे केव्हाही आतताईपणे वागू नये. कारण येथे धैर्यच अशी एक गोष्ट आहे की त्यामुळे मनुष्य पूर्णपणे तरला जातो आणि त्याची भोगांपासून सहज सुटका होते.

कारण धैर्यच येथे असे एक कारण ठरते की ज्यामुळे मग नारायणाला देखील याचकाची दया येऊन त्याला सहाय्य्य करावेच लागते, त्याची पाठराखण करावीच लागते. 

कारण धीर धरणे किंवा धैर्याने सत्याची कास धरून ठेवणे आणि कठीण प्रसंगात देखील ती न सोडणे आणि वर आडवाटेने न जाता हिमतीने त्याला तोंड देत राहणे हेच देवाला अपेक्षित असते.

त्यामुळे धैर्य बाळगणाऱ्या प्रत्येकासाठी नारायण जातीने धावून जातो आणि त्यांचा पूर्ण भार स्वतःच्या शिरी घेऊन त्यांचे संपूर्ण संरक्षण करतो.

त्यामुळे तुकोबा म्हणतात मनुष्याने देखील देवाचा हा स्वभाव लक्षात घेऊन केव्हाही धैर्य खचू देऊ नये आणि कोणत्याही काळी ह्या सर्वाचा क्षीणदेखील वाटून घेऊ नये.

उलट अशावेळी आवश्यक असलेली सर्व काळजी आपण घेत आहोत हे जाणून आणि सर्व चिंता सोडूनदेऊन  देवाचे सुखाने कीर्तन करावे, आनंदाने त्याचे गुण गावेत आणि बिनघोरपणे त्याच्या चिंतनात रममाण व्हावे. 

कारण अशाने केवळ दुःखापासूनच नव्हे तर काळापासून देखील त्याचे आपोआप रक्षण होते.

कारण महाराज म्हणतात श्री हरिला शरण गेलेल्यांचे आणि त्याचे नाम गाणाऱ्यांचे मग सुदर्शन स्वतःच येऊन संकटांपासून आणि काळापासून संरक्षण करते, त्यांची कळीकाळापासून देखील सुटका करते आणि त्यासाठी ते श्रीहरिच्या आज्ञेची देखील वाट बघत नाही.

ते पुढे म्हणतात ज्याप्रमाणे माता जशी आपल्या बाळासाठी स्वतःचा जीव वेचते, त्यावर संकट येताच स्वतःचा प्राण त्यागण्यास देखील ती मागे पुढे पाहत नाही.

त्याप्रमाणे देवदेखील आपल्या भक्तांचे पोटच्या लेकरांप्रमाणेच सांभाळ करतो, त्यांना हाताच्या फोडाप्रमाणे जपतो आणि त्यांच्या केसालाही कधी धक्का लागू देत नाही.

त्यामुळे ते म्हणतात कोणीही येथे चुकूनही देवाला कधी प्राकृतासमान लेखू नये. म्हणजेच देवाला ह्या प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या एखाद्या सर्वसामान्य जीवाप्रमाणे लेखू नये.

कारण त्याचे दातृत्व फार मोठे असून त्याचा त्याची कामगिरी आणि पराक्रम तर अलौकिक आहे. आणि मुख्य म्हणजे येथील सामान्य जीवांप्रमाणे द्वेष आणि मत्सराने भरलेला नसून तो दया-क्षमा-शांतीने भरलेला आहे.

त्याच्याठायी मनुष्याप्रमाणे कामक्रोध सहज उत्पन्न होत नाही. उलट दिन-दुबळ्यांना पाहून आणि वारंवार भोग भोगून दुःखीकष्टी झालेले जीव पाहून त्याच्या चित्ती कळवळा दाटून येतो आणि शरण आलेल्या जीवांना तो लागलीच तारतो.

तुकोबाराय शेवटी म्हणतात आणि हे मी सर्व तुम्हांला माझ्या अनुभवावरूनच सांगत असून ज्या गोष्टीची मला, माझ्या जीवाला प्रचीती आली आहे तेच मी येथे कथन करीत आहे. 

म्हणजे विनाकारण काहीतरी खोटेनाटे सांगून कोणालाही भुलवत नसून दिशाभूल करण्याचा माझा किंचितही प्रयत्न नाही. 

आणि म्हणून तुम्ही देखील सर्वांनी जर त्यावर पूर्ण विश्वास ठेवलात तर तुम्हां सर्वांनाही तशी अनुभूती येण्यास वेळ लागणार नाही आणि सत्य काय आहे ते आपसूकच कळून येईल.

अभंग ६६५


Post a Comment

0 Comments